मुंबई
मुंबई : ’मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषा दिन चिंतित मनानं साजरा करण्याची गरज नाही. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची. त्या मराठी भाषेचं वाकडं करण्याची कोणाची टाप आहे,’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक मराठी भाषा दिनी केला.
कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी आज जगभर मराठी भाषा दिन साजरा होत आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यानं आज विधान भवनात सरकारच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला. ग्रंथ दिंडीने या सोहळ्याची सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय आमदार या सोहळ्यात सहभागी झाले होते. विधान भवनात ग्रंथ दिंडी आणण्यात आली. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही ग्रंथ दिंडी खांद्यावर वाहून आणली. त्यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ उपस्थित होते.
त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन केले. विधान भवन प्रांगणात बारा बलुतेदारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या बारा बलुतेदरांनी आपली कला इथे सादर केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या कलाकारीची पाहणी केली.
आजच दृश्य हे वेगळे आहे. कारण सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि इतर पक्ष एकत्र येऊन आपल्या आईचा सन्मान (मराठी भाषा) करत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करणारी माँ जिजाऊंची भाषा म्हणजे मराठी आहे. मराठ्यांच्या घोड्यांच्या टाफेने दुष्मनांचे धाबे दणाणत होते. त्यामुळे मराठी भाषा संपवण्याची कोणाची ‘टाफ’ होणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठी भाषा ही भक्ती आणि शक्तीची भाषा असल्याचेही ते म्हणाले.‘हे’ भाग्य मला लाभले आपल्या मातृभाषेचा अभिमान स्वाभिमान टिकवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. संत ज्ञानेश्वर, बहिनाबाईंनी संत तुकाराम, यांनी मराठी भाषा समृद्ध केली. मराठी भाषा अनिवार्य करण्याचे भाग्य माझ्या कार्यकाळात झाले, याचा मला अभिमान असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.आता वासूदेव गेला, गोंधळी गेले, हे सगळ लुप्त झाले आहे. हे मराठी भाषेचे दृश्य स्वरूप आहे, ते जपले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले. मराठी संपवण्यासाठी मुघल आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले पण कोणाची माय व्याली नाही, तिला कोणी संपवू शकणार नाही, असे सडतोड वक्तव्य यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. भाषा ही संस्कारातून येत असते. ती भाषा राजभाषा झालीच पाहिजे. कारण ते भाग्य मला लाभले. आता माणूस मोबाईल वेडा झाला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. इंग्रजांना ठणकावणारी लोकमान्य टिळकांची भाषासुद्धा मराठीच होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. गोंधळी बाहेरच बरे कारण ते आत आले तर आम्ही काय करणार? असे म्हणत सभागृहात गोंधळ घालणार्या विरोधकांना टोला लगावला. या भाषेचा ठेवा जपण्याचे काम आपण करणे गरजेचे आहे.
मातृभाषा संपवण्याची कोणाची हिंमत नाही. कारण ती दगडावर, र्हदयावर, डोंगरावर कोरल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री, आमदार आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आईच्या सन्मानाचा दिवस जागतिक मराठी भाषा दिनी मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार