दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बदली
नवी दिल्ली

 दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांना फटकारे लगावणारे दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीयमने 12 फेब्रुवारीला झालेल्या आपल्या बैठकीत त्यांच्या बदलीची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली केली आहे. राष्ट्रपतींनी न्यायाधीश मुरलीधरन यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहावे असे आदेश दिल्याचे त्या बाबतच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
न्यायाधीश एस. मुरलीधर यांची 29 मे 2006 ला दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. इथल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी आयपीसी कलम 377 ला देखील नॉन क्रिमिनल घोषित केले होते. ज्येष्ठतेनुसार न्यायाधीश मुरलीधर हे दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीशांमध्ये तिसर्‍या स्थानी होते. आता बदलीनंतर पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात ते मुख्य न्यायाधीश रविशंकर झा यांच्यानंतर दुसर्‍या स्थानी असतील.
सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील कॉलिजीयमने 12 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत न्यायाधीश मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉलिजीयमच्या या निर्णयाचा दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशनने विरोध केला होता. बुधवारी न्यायाधीश मुरलीधर आणि न्यायाधीश तलवंत सिंह यांच्या विभागीय खंडपीठाने ईशान्य दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचारासंदर्भात पोलिस दलांनी योग्य ती कारवाई केली नसल्याचे सांगत चिंता व्यक्त केली होती. या हिंसाचारात आतापर्यंत 27 लोकांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.