प्रेमविवाह न करण्याची शपथ ः 3 प्राध्यापक निलंबित
अमरावती

 महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाना व्हॅलेंटाइन दिनाच्या पार्श्वभूमीवर ममी प्रेमविवाह करणार नाहीफ अशी शपथ दिल्याप्रकरणी अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ही शपथ देण्यात पुढाकार असलेल्या तीन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे.
चांदुर रेल्वे येथील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी संचालित महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात 13 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. हे शिबिर टेंभुर्णा येथे घेण्यात आले होते. या शिबिरात देण्यात आलेल्या प्रेमविवाहाबाबतच्या शपथेने वादळ उठले होते. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मकॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची... त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला हवी की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अ‍ॅसिड फेकणार नाही, कुणाला जिवंत जाळणार नाही. कुणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला चोख प्रत्युत्तर देईन अशा तीव्र भावना माजी महिला-बालकल्याण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, या संपूर्ण वादाची गंभीर दखल घेत अखेर 13 दिवसांनंतर संबंधित प्रकाराला जबाबदार असलेल्या तीन प्राध्यापकांवर कारवाई करण्यात आली आहे.